पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील नवनिर्वाचित सदस्य सहलीसाठी गेले असता एका सदस्याचा मद्यसेवनामुळे मृत्यू झाला की घातपात ?

0
516

पाचोरा, प्रतिनिधी । गुरुवार दि. २८ रोजी जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंचपदासाठी इच्छुकांना सहलीला पाठविण्यात आले आहे. यातच पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील नवनिर्वाचित सदस्य सहलीसाठी गेले असता एका सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे.

सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच पदासाठी काठावर असलेल्या अनेक गावातील नवनिर्वाचित सदस्य सहलीला गेलेले असुन यातीलच जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग रामदास पाटील यांच्या वडगांव टेक येथील चार सदस्यांना पदमसिंग पाटील यांचे विरोधातील पॅनल प्रमुख सहलीला दमन (वापी) येथे सहलीला घेऊन गेल्या नंतर दि. २९ रोजी ते नाशिक येथे मुक्कामी आले होते. मात्र अति मद्यसेवनामुळे एका ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त असुन त्या सदस्याचा अति मद्यसेवनामुळे मृत्यू झाला की घातपात झाला ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असुन रात्री उशिरापर्यंत पाचोरा पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकार नोंद करण्यात आली नव्हती.

पाचोरा तालुक्यातील १०० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दि. २८ रोजी आरक्षण जाहीर करण्यात आले. ज्या गावांमध्ये १५ पैकी ८, ९ पैकी ५, १३ पैकी ७, १७ पैकी १० असे सदस्य निवडून आले आहेत. त्यातील एक किंवा दोन सदस्यांना पैशांचे आमिष दाखवुन आपल्या बाजुला वळवावे. यासाठी, नगरदेवळा, लोहारा, कुऱ्हाड बु”, कुऱ्हाड खु”, सातगाव (डोंगरी) यासह काही गावातील सदस्यांना पॅनल प्रमुख सहलीला घेऊन गेले आहे. त्यातीलच वडगांव खु” प्र. पा. (टेक) येथे माघारीच्या दिवसा अखेर ४ सदस्य बिनविरोध तर ३ सदस्य निवडणुकीत निवडून आले होते. यातील ४ सदस्य जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील यांचे बाजुचे बिनविरोध झाल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी योगेश कुमावत हे त्यांचे सह भिका सोमा भिल, भगवान बाळु पाटील, नाना अवचित पाटील, रमेश शांताराम पाटील यांना दि. २८ रोजी दमन (वापी) येथे सहलीला घेऊन गेले होते. दमन हुन ते दि. २८ रोजी नाशिकला मुक्कामी आल्यानंतर दि. ३० रोजी पहाटे भिका सोमा भिल यास उठविण्यास गेले असता रात्रीतुन त्याचा मृत्यू झालेला होता. भिका भिल याने मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केल्याने त्याचा झोपेतच मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र वडगांव (टेक) येथे सद्यस्थितीत ६ सदस्य राहीले असुन पोलिस तपासानंतरच भिका भिल यांचा मृत्यूचे रहस्य उलगडणार आहे.