आरोग्य दूत न्यूज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दिनांक २४ मे, २०२१
जळगाव- पाच गावांना पाणी टंचाई उदभवू नये, यासाठी हतनूर
धरणातून बिगर कृषक कामासाठी आवर्तन सोडण्यास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी मान्यता दिल्यानंतर आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी हतनूर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे २.९२ द.ल.घ.फु. बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे या गावांची पाणीटंचाईतून सुटका झाली असून त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहेत.
जळगाव तालुक्यातील ममुराबाद, विदगाव, आवाड, खापरखेडा, तुरखेडा आणि नांद्रा खुर्द या गावांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी या गावांतील सरपंच व इतर ग्रामस्थांनी शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी २.९२ द.ल.घ.फु. पाण्याचे आकस्मिक आरक्षण करुन, हतनूर धरणातून हतनूर उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यास तातडीने मान्यता दिली व या गावांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागास दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी बिगरसिंचन पाणी वापर संस्थेने आवर्तन कालावधीत पाहणी पथक व वाहन निरिक्षणासाठी तयार ठेवावे. तसेच आवर्तन कालावधीत पुरेसा कर्मचारी वर्ग निरिक्षणाकरीता उपलब्ध करून द्यावा. या अटींवर या गावांसाठी हतनूर उजव्या कालव्याद्वारे बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे.
जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे ३० व ३१ मे रोजी आयोजन
जळगाव (जिमाका) दि. २४ पंडीत दिनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे ३० व ३१ मे, २०२१ रोजी आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती डॉ. राजपाल म. कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी केले आहे.
या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील वा जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी एसएससी/एचएससी/पदवीधर/ पदवीकाधारक/आयटीआय पात्रतेची एकूण ६७० रिक्तपदे भरण्याविषयी कळविले आहे.
या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अॅप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉगीन करुन अप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉगीन करुन अॅप्लाय करावे.
याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे मेळावा ऑनलाईन असल्याने उमेदवारांनी कार्यालयात अथवा नियोक्याकडे या कालावधीत प्रत्यक्ष उपस्थित राहू नये, असेही डॉ. कोल्हे यांनी कळविले आहे.