आरोग्य दूत न्यूज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,१०/६/२०२१
जळगाव- जिल्ह्यात-आतापर्यंत ५ लाख ७१ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण
जळगाव, जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४० हजार ८९ नागरीकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर १ लाख ३१ हजार ४०० नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला असून आतापर्यंत एकूण ५ लाख ७१ हजार ४८९ लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारी, २०२१ रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ४५ वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोनाची लस देण्यात आली. तर १ मे ते ११ मेपर्यंत जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी पुढे आल्याने जिल्ह्यात लसीकरणास वेग आला आहे.
तालुकानिहाय व आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण लाभार्थी माहिती
(कंसात दुसरा डोस घेणारे लाभार्थी संख्या)
अमळनेर तालुक्यात १० हजार १३३ लाभार्थ्यांना पहिला डोस तर ४ हजार ४१० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. भुसावळ ३५८६१ (१४७६८), बोदवड ४०१५ (१९९८), भडगाव ५८५३ (१९८२), चाळीसगाव ९६९१ (३३७७), चोपडा ७८६१ (२२८८), धरणगाव ५६०३ (१६६८), एरंडोल ५१८६ (१८५३), जामनेर ७८६७ (४३५१), मुक्ताईनगर ५५५४ (१९७९), पाचोरा ९२७५ (३४६६), पारोळा ६१६९ (२६५६), रावेर १०६२८ (४२७७), यावल ९७८८ (४४८३), जळगाव ७४६०७ (२३०८५), प्राथमिक आरोग्य केंद्र १ लाख ५२ हजार २७० (४०४१६), प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ३५८८९ (४५०४), प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील खाजगी रुग्णालये ३९८९६ (९३७९), विश्वप्रभा खाजगी रुग्णालय ३९४३ (१२६०) याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४० हजार ८९ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर १ लाख ३१ हजार ४०० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आल्याचेही डॉ जमादार यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.