जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध शेतकरी बांधवांनी खताच्या बॅगवरील निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खते खरेदी करु नये. {कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे}

0
162

आरोग्य दूत न्यूज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दिनांक,25/6/2021
जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध शेतकरी बांधवांनी खताच्या बॅगवरील निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खते खरेदी करु नये. {कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे}
जळगाव- खरीप हंगाम-2021 साठी जिल्ह्यात खते व बियाण्यांची उपलब्धता मुबलक प्रमाणात असून खत पुरवठा सुरळीत सुरु आहे. खरीप हंगाम 2021 साठी युरीया खताचे माहे जुनअखेर 55.972 मे.टन पुरवठयाचे आवंटन होते. जिल्ह्यात मागील रब्बी हंगामातील युरीया या मुख्य खताचा 26.070 मे. टन एवढा साठा या खरिप हंगामात विक्रीसाठी उपलब्ध होता. तसेच माहे एप्रिल, मे व 21 जुन, 2021 अखेर युरीया खताचा 46.198 मे. टन पुरवठा झालेला आहे. मागील व आत्ताचे असे एकुण 72.268 मे. टन युरीया खत विक्रीसाठी या खरिप हंगामात उपलब्ध झालेले आहे.
तसेच जुन महिनाअखेर आर.सी.एफ या कंपनीमार्फत 5 हजार मे. टन. एन.एफ.एल मार्फत 2600 मे. टन. इफकोमार्फत 2600 व आयपीएलमार्फत 4800 असे एकुण 15 हजार मे. टन युरीया खत पुरवठयाचे नियोजन आहे. एसएसपी खताचा देखील 22.044 मे. टन एमओपी खताचा 19.386 मे. टन डीएपी चा 3329 व इतर संयुक्त खते जसे 10.26.26., 15.15.15., 20.20.0 व 16.16.16 या खतांचा पुरवठा 31031 मे.टन एवढा झालेला आहे. एकंदरीतच जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात सर्व खते उपलब्ध असुन दरमहा खतांच्या उपलब्धतेचे नियोजन केलेले असून त्याप्रमाणे पुरवठा सुरळीत होत आहे.
जळगाव जिल्ह्यात कापुस हे प्रमुख पिक आहे. जास्त प्रमाणात युरीया खत दिल्यास पिकाची कायीक वाढ जास्त प्रमाणात होऊन रसशोषक (मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरीमाशी) या किडींचा प्रादुर्भाव होवून कापुस पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. या रसशोषक किडींचे नियंत्रण करण्यासाठी किटकनाशक फवारणीचा खर्च वाढतो तसेच उत्पन्नात घट येते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी फक्त युरीया खताचा वापर न करता इतर उपलब्ध सरळ, मिश्र व संयुक्त खतांचा वापर संतुलीत प्रमाणात करावा. तसेच पुरेश्या प्रमाणात पाऊस व पुर्ण ओल असल्याशिवाय, सोयाबीन, उडीद, मुग यासारख्या उष्णतेस संवेदनशील पिकांची व इतर पिकांची देखील लागवड करु नये. कृषि निवीष्ठा विक्रेते यांनी कृत्रीम खत टंचाई निर्माण करुन जादा दराने विक्री करु नये म्हणुन जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत तपासणी सुरु आहे.
शेतकरी बांधवांनी खताच्या बॅगवरील निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खते खरेदी करु नये. जादा दराने खत विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी. एकाच वेळी जास्त खत खरेदी करुन साठा करुन ठेवू नये. सर्व खते उपलब्ध असल्याने जसे लागेल तसेच खत उचल करावी. खत खरेदी पक्क्या बिलाने व अधिकृत दुकानातुनच करावी, शेतकरी बांधवांनी जमिनीचे आरोग्य व पर्यायाने स्वत:चे आरोग्य देखील सांभाळावे व खर्चात बचत करावी, असे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद वैभव शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.