जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 12 लाख 13 हजार लाभार्थ्यांना दिले कोरोना लसीचे डोस

0
246

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,२६/८/२०२१
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत
12 लाख 13 हजार लाभार्थ्यांना दिले कोरोना लसीचे डोस
जळगाव- कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच नागरीकांच्या लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 96 हजार 938 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 3 लाख 15 हजार 916 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 12 लाख 12 हजार 854 लाभार्थ्यांना कोरोना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्यातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
 जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात केली. त्यानंतर 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. तर 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तर 1 मे ते 11 मेपर्यंत जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले. त्यानंतर 21 जूनपासून जिल्ह्यातील 18 वर्षापुढील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी गर्दी करीत आहे.
कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांचे सहज व सुलभ लसीकरण व्हावे याकरीता जिल्ह्यात लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात येत आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 96 हजार 938 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 3 लाख 15 हजार 916 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 12 लाख 12 हजार 854 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 5 लाख 86 हजार 210 तर ग्रामीण भागातील 6 लाख 26 हजार 644 लाभार्थ्यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय झालेले लसीकरण आकडेवारी
जळगाव-305148, भुसावळ-154978, अमळनेर-75401, चोपडा-77138, पाचोरा-64253, भडगाव-40198, धरणगाव-39869, यावल-67960, एरंडोल-35814, जामनेर-76621, रावेर-82325, पारोळा-40626, चाळीसगाव-93781, मुक्ताईनगर-36777, बोदवड-21965 याप्रमाणे लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आल्या 15 लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या
जळगाव (जिमाका) दि. 26 – जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या नागरीकांची प्राधान्याने कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत (25 ऑगस्ट) 15 लाख 519 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 42 हजार 690 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या विविध उपायायोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब असली तरी भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हावासियांनी यापुढेही कोरोना नियमांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ट्रीपल टी’ (ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट) वर भर दिला असून यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. याकरीता जिल्ह्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदेच्या क्षेत्रात अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग्य यंत्रणेमार्फत संशयित रुग्ण शोध मोहिम प्रभावीपणे राबवून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील हायरिस्क व लोरिस्क व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचबरोबर कोरोना सदृश्य लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींच्या चाचणीवर विशेष भर देण्यात आला. जेणेकरुन बाधित रुग्णांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला वेळेत उपचार मिळून रुग्ण लवकर बरा होण्यास मदत झाली.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात आवश्यकतेनुसार कोरोना संशयितांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या 15 लाख 519 व्यक्तींच्या कोरोना चाचण्यांपैकी 13 लाख 55 हजार 662 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 1 लाख 42 हजार 690 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 9 लाख 81 हजार 27 व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली असून यापैकी 84 हजार 808 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर 5 लाख 19 हजार 492 व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून पैकी 57 हजार 882 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तसेच 1 हजार 928 ईतर अहवाल आढळले असून सध्या 239 अहवाल प्रलंबित असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-19 चे नोडल अधिकारी डॉ एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी त्वरीत निदान, त्वरीत उपचार या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तींस कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी त्वरीत नजिकच्या रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच जिल्हावासियांनी यापुढेही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.