आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,२३/९/२०२१
हातभट्टी दारू व्यवसायावर उत्पादन शुल्क विभागाची ‘टाच’
समुळ उच्चाटनासाठी उत्पादन शुल्क विभागाची 8 ऑक्टोंबर पर्यंत विशेष मोहिम
मागील 15 दिवसांत 10 लक्ष 12 हजार 380 रूपयांचा मुद्देमाल जप्त
अवैध दारू धंद्याचे 84 गुन्हे, 75 आरोपींना अटक
बुलडाणा- उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्या आदेशानुसार हातभट्टीच्या दारूचे उत्पादन, वाहतुक व विक्री या विरूद्ध कडक कारवाई करून हातभट्टी दारूचे समुळ उच्चाटनासाठी उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम 8 ऑक्टोंबर पर्यंत चालणार असून यामुळे हातभट्टी दारू व्यवसायावर उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईची टाच दिसून येत आहे. ही मोहिम 5 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. या मागील 15 दिवसात विभागाने जिल्हाभरात अवैध दारू धंद्यावर 84 गुन्हे नोंदविले. त्यामध्ये एकूण 73 वारस गुन्हे नोंदवून एकूण 75 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे विभागाने 11 बेवारस गुन्हे नोंदविले आहे. या कारवाईमध्ये 947 लिटर हातभट्टी दारू,17 हजार 429 लिटर रसायन, 306.59 लिटर देशी दारू व 6.84 लिटर विदेशी दारू तसेच 25 लिटर ताडी जप्त केली आहे. या मोहिमेमध्ये अवैध मद्य वाहतुक अथवा विक्री करणारे एकूण 9 वाहने जप्त करण्या आली आहे. त्यापैकी 8 दुचाकी व 1 तिन चाकी वाहन आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत 4,51,000 रूपये आहे. तसेच वाहनाखेरीज इतर जप्त मुद्देमालाची किंमत 5,61,380 रूपये इतकी असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 10 लक्ष 12 हजार 380 रूपये इतकी आहे.
मोहिमेदरम्यान 8 सप्टेंबर रोजी बिबी ता. लोणार येथे मेहकरचे दुय्यम निरीक्षक एस. डी चव्हाण यांनी 1 वारस गुन्हा नोंदवून 47 हजार 930 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये 45 हजार रूपये किंमतीची 1 दुचाकी आहे. तसेच 11 सप्टेंबर रोजी मलकापूर तालुक्यातील झोडगा शिवारात दुय्यम निरीक्षक अमित अडळकर यांनी 1 वार गुन्हा नोंदवून 37 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 36 हजार रूपये किंमतीच्या दुचाकीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 12 सप्टेंबर रोजी पिं. काळे ता. जळगांव जामोद शिवारात शेगावचे दुय्यम निरीक्षक एन. के मावळे यांनी 1 वारस गुन्हा नोंदवीत 70 हजार 760 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये 65 हजार रूपये किमतीची एक दुचाकी आहे. तसेच 17 सप्टेंबर रोजी गव्हाण फाटा ता. खामगांव येथे दुय्यम निरीक्षक आर. के फुसे यांनी 1 वारस गुन्हा नोंदविला आहे. याठिकाणी 71 हजार 540 रूपये किंमतीचा मुद्देमालामध्ये 60 हजार रूपये किंमतीची दुचाकीही जप्त केली आहे. मलकापूर तालुक्यातील हरसोडा जुने येथे 22 सप्टेंबर रोजी दुय्यम निरीक्षक अमित अडळकर यांनी 1 वारस गुन्हा नोंदवित 70 हजार 550 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये 65 हजार रूपये किमतीची दुचाकी आहे. त्याचप्रमाणे 6 सप्टेंबर रोजी प्र. निरीक्षक, भरारी पथक आर. आर उरकुडे यांनी एक दुचाकी, 22 सप्टेंबर रोजी 1 दुचाकी व 1 तीन चाकी वाहन जप्त केले आहे. त्याची किंमत 1 लक्ष 6 हजार 860 रूपये आहे.
अशाप्रकारे जिल्ह्यात सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये नागपूरचे विभागीय उपआयुक्त मो. सु. वर्धे, अधिक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जी. आर गावंडे, दुय्यम निरीक्षक एन. के मावळे, आर. के फुसे, अमित अडळकर, रविराज सोनुने, एस. डी चव्हाण, आर.आर उरकुडे, वा.रा बरडे, पी.व्ही मुंगडे व सर्व जवान, जवान नि वाहनचालक यांनी सहभाग घेतला, असे अधिक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.