घोडसगाव बंधाऱ्यांची भिंत वाहून गेली प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन

0
948

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,२८/९/२०२१

घोडसगाव बंधाऱ्यांची भिंत वाहून गेली

प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल
परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन
जळगाव – लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणारा बहुळा नदीवरील पाचोरा तालुक्यातील घोडसगाव येथील कोल्हापूर पध्दतीच्या (केटीवेअर) बंधाऱ्याची 3 फूट उंचीची भिंत पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली आहे, त्यामुळे नदीचा प्रवाह वाढलेला असून परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत आवश्यक ती कार्यवाही संबंधित यंत्रणा करीत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.
सोयगाव तालुक्यातील डोंगराळ भागात झालेल्या पावसामुळे बहुळा नदीच्या प्रवाहात वाढ झाली असून घोडसगाव बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे बंधाऱ्याची तीन फूट उंचीची भींत वाहून गेली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपळगाव- हरेश्वर, भोजे, चिंचपुरे, वरखेडी भागात शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. संबंधित गावांचे तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील यांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना दिलेल्या आहेत. पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्याबरोबरच आवश्यक तेथे नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाचोराचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्यासह तहसीदारांना घटनास्थळी भेट देवून आवश्यक ती कार्यवाही करीत आहेत. तसेच ते लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
सद्य:स्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेली आहे. त्यांच्या माध्यमातून मदत कार्य सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.