शासकीय/निमशासकीय कार्यालयांसह खाजगी आस्थापनांमधील अधिकारी, कर्मचारी व अभ्यागंतासाठी मास्क वापरणे बंधनकारक अन्यथा भरावा लागणार पाचशे रुपये [जिल्हाधिकारी अभिजीत राऊत]

0
232

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,२९/१०/२०२१

शासकीय/निमशासकीय कार्यालयांसह खाजगी आस्थापनांमधील

अधिकारी, कर्मचारी व अभ्यागंतासाठी मास्क वापरणे बंधनकारक
अन्यथा भरावा लागणार पाचशे रुपये दंड
जळगाव – कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे.
धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे, नाट्यगृहे, बंदिस्त सभागृहे/मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम व चित्रपटगृहे, अम्युझमेंट पार्क, इंडस्ट्रीज हे सुरु करण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले असून त्यानुसार सुधारीत आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील आदेश दिनांक 26 ऑक्टोबर, 2021 अन्वये “ब्रेक दि चेन” अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय व खाजगी, औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर करणे व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश लागू करण्यात आलेले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय व खाजगी, औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी/कर्मचारी व कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या सर्व अभ्यांगतांना कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक, तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.
जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय व खाजगी, औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख/आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतीम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचेकडून प्राप्त करुन घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा आरोग्य विभागात संपर्क साधून कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल, याची खातरजमा करावी.
सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजाच्या दरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करुन घेणे यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याला नामनिर्देशन करावे.
सर्व कार्यालय व कार्यालयाच्या आवारात अभ्यांगतांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणारे अभ्यांगत/कर्मचारी/अधिकारी यांना संबंधित अभ्यांगत/कर्मचारी/अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात/आवारात विनामास्क आढळतील त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी (कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला अधिकारी) रक्कम रुपये 500/- प्रमाणे दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहील.
विनामास्क आढळणारे अभ्यांगत / कर्मचारी / अधिकारी यांना दंडाची आकारणी करुन सक्षम प्राधिकाऱ्याने पावती द्यावी व सदर दंडाची रक्कम कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडेस जमा करावी,     आहरण व संवितरण अधिकारी यांनी अशा प्रकारे जमा झालेल्या दंडाची रक्कम महसूल जमा (सी) इतर कराव्यतिरिक्त महसूल (एक) सर्वसाधारण सेवा, 0070- इतर प्रशासकीय सेवा, 800 इतर जमा रक्कम या लेखाशिर्षाखाली शासनजमा करण्याची कार्यवाही करुन त्याबाबत आवश्यक ती नोंद आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंदवहीत घ्यावी.
या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्य्वस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदरनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहे.