जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी डॉ.अनुराधा राऊत यांनी दिवाळीच्या रात्री खाद्यपदार्थ,उबदार कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत मायेची ऊब दिली.

0
937

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)

दि,५/११/२०२१

जळगाव – जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा राऊत यांनी दिवाळीच्या रात्री खाद्यपदार्थ, उबदार कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत मायेची ऊब दिली. कोणताही बडेजावपणा न करताना जिल्हाधिकारी व त्यांच्या पत्नीने अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केल्याने निराधारांचेही डोळे पाणावले व त्यांनी या दांपत्यास दोन्ही हाताने आशीर्वाद दिले.देवदूत दांपत्य म्हणजे जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी तथा जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ.अनुराधा राऊत हे दांपत्य.त्यांनी कोणालाही न सांगता गुप्तदानाच्या हिशोबाने गरजूंना मदत करण्यासाठी ते दिवाळीच्या रात्री बाहेर पडले. यादरम्यान त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या जवळपास ४० बेघर, निराधारांना थंडीपासून बचावासाठी शाल,आधार म्हणून खाद्यपदार्थ, बाम, औषधी, टूथपेस्ट, थंडीपासून बचाव करणारे मलम असे विविध साहित्य देऊन भर थंडीत मायेची ऊब दिली. निराधारांचे पाणावले डोळे एका ठिकाणी आपले खाजगी वाहन लावून हे साहित्य हातात घेत पायी फिरत या दाम्पत्याने गरजूंना मदत केली. दिवाळीच्या रात्री अचानकपणे पोटाला आधार व थंडीपासून बचाव करणारे कपडे मिळाल्याने निराधारांचे डोळे पाणावले. या मदतीने भारावलेल्या बेघर, निराधारांनी या दांपत्यास दोन्ही हाताने आशीर्वाद देत दीर्घायुष्याची प्रार्थना केली.

महापालिकेच्या निवारा केंद्रात हलविण्याच्या तात्काळ हालचाली
बेघर निराधारांचे हे हाल पाहून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रशासकीय जबाबदारी देखील सांभाळत या निराधारांना महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्याच्या हालचाली तात्काळ सुरू केल्या. यंदा थंडीचे प्रमाण अधिक राहणार असल्याने ही सर्व मंडळी यातून सुरक्षित राहावे म्हणून त्यांना लवकरात लवकर निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.