प्रादेशिक परिवहन विभागातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्ष

0
254

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे (प्रतिनिधी)
दिनांक – 18 नोव्हेंबर, 2021

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे  प्रवाशांच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्ष

जळगाव – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आठ नोव्हेंबर 2021 पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.

 श्री. लोही यांनी म्हटले आहे, खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बस  व मालवाहू वाहनाव्दारे प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने बस उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षकांची बस स्थानकनिहाय नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जळगाव शहर जुने व नवे बसस्थानक, भुसावळ बसस्थानक, चाळीसगाव बसस्थानक व अमळनेर बस स्थानक येथे अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्व बसस्थानकांवर प्रवाशांच्या गरजेनुसार स्थानिक ठिकाणचे स्कूल बस वाहतूकदार, खासगी बस वाहतूकदार किंवा मालवाहू वाहतूकदारांशी संपर्क साधत वाहने उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यवाहीच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.
नऊ नोव्हेंबर 2021 पासून जिल्ह्यातील विविध एस.टी. आगारातून आजपर्यंत एकूण 74 खासगी बस, 12 स्कूल बस व 592 इतर प्रवासी वाहने प्रवाशांच्या गरजेनुसार या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमार्फत पुरविण्यात आलेली आहेत. संप काळात प्रवाशांच्या सोयीकरीत या कार्यालयात नियंत्रक कक्षाची स्थापना केलेली असून दूरध्वनी क्रमांक  0257-2261819 असा आहे. प्रवाशांना वाहनाची उपलब्धता किंवा मागणी असल्यास त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधून त्यांनी मागणी नोंदवावी.
जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रवासी वाहतूक संघटना व मालवाहतूक संघटना पदाधिकाऱ्यांनी संप कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहने उपलब्ध करुन देण्याबाबत या कार्यालयास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.