महिलांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावी जिल्हाधिकारी अभिजित राऊत

0
396

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)

दिनांक – ९ डिसेंबर, 2021

महिलांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी

स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावी
जिल्हाधिकारी अभिजित राऊत : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून
संरक्षण अधिनियमाचा वर्धापन दिन
जळगाव भारतीय संस्कृतीने महिलांना आदराचे स्थान दिले आहे. महिलांचा नेहमीच सन्मान केला आहे. असाच सन्मान प्रत्येक आस्थापनेने दिला पाहिजे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमानुसार प्रत्येक आस्थापनेत स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली.
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियमाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत, मणियार विधी महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजेता सिंग उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, भारतीय घटनेने महिलांना समानतेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे महिलांना लैंगिक छळापासून मुक्त व सुरक्षित वातावरणाचा अधिकार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने महिलांना सन्मानाची आणि समानतेची वागणूक दिली पाहिजे. या अधिनियमांतर्गत महिलांची तक्रार असेल, तर त्यांना समितीकडे दाद मागता येईल. या कायद्याच्या पालनाची नियोक्ता आणि आस्थापनांची जबाबदारी आहे.
प्रा. डॉ. सिंग म्हणाल्या, शासकीय, निमशासकीय, खासगी ठिकाणी काम करणारी महिला सुरक्षित असावी आणि तिला सन्मान मिळावा यासाठी विभागप्रमुखांनी दक्ष असायला हवे. यावेळी प्रा. डॉ. सिंग यांनी या अधिनियमांतर्गत तक्रार निवारण समिती, या समितीचे कार्य, प्राप्त तक्रारींवर करावयाची कार्यपध्दती याविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. सोनगत यांनी प्रास्ताविकात या अधिनियमाची माहिती दिली. सारिका मेतकर यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.