यशस्वी न होणारे बलून बंधारे बांधण्याचा हट्ट खासदार आणि आमदार यांनी करू नये.दिलीप भाऊ वाघ

0
129

रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि, १८/जाने/२०२२
शेतकरी हितासाठी….
यशस्वी न होणारे बलून बंधारे बांधण्याचा हट्ट खासदार आणि आमदार यांनी करू नये. दिलीप भाऊ वाघ
पाचोरा तालुक्यातील उतावळी नदी जोड प्रकल्प प्रलंबीत असतांना पाचोरा – भडगाव मतदार संघातील सात बलून बंधारे बाबत अनेक वर्षांपासून राजकीय श्रेय घेण्याचा गोंधळ सुरू आहे. मुंबई भागातील एक प्रकल्प वगळता देशात बलून बंधारे कोठेच नाही. मोठ्या धरणातून नदीत वाहणाऱ्या पाण्यात काटेरी झाडे- झुडपे, लाकडाची ओंडके ,मेलेली जनावरें व अन्य प्रकारची घाण पाण्याच्या प्रवाहात वाहून येते.असे असतांना संभाव्य बलून बंधाऱ्यात ही घाण येऊ शकते.? ही वस्तुस्थिती आहे. म्हणून बलून बंधारे यशस्वी होत नसल्याची शंका आहे. नुकतीच खासदार उन्मेष पाटील यांची गिरणानदी परिक्रमा सुरू आहे.खासदार बलून बंधारे बांधण्यासाठी भाजप सरकारच्या काळात केंद्र व राज्य सरकार कडून आवश्यक मंजूरीचा पाठपुरावा केल्याचा दावा करीत आहेत. तर शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे देखील बलून बंधारे बांधण्यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा करीत आहेत. माझा बलून बंधारे बांधण्याला कोणताही विरोध नाही. किंवा या विषयावर मला राजकारण करायचे नाही. खासदार व आमदार यांच्यावर आरोपही करायचे नाही. मतदार संघाचा माजी प्रतिनिधी म्हणून खासदार आणि आमदार या दोघांनी समनव्य साधून जास्त वेळ आणि कोट्यावधींचा खर्च लागणारे आणि यशस्वी न होणारे बलून बंधारे बांधण्याचा हट्ट सोडावा. शेतकरी हितासाठी आणि मतदार संघातील भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील काही गावांसह दहीगाव ते म्हसावद पर्यंतच्या परिसरातील शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कमी वेळात आणि कमी खर्चात लवकर तयार होणारे बॅरेजेस बांधण्यावर लक्ष केंद्रित करावे. असा सल्ला राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी केलेल्या संवादात खासदार आणि आमदारांना दिला आहे.
सन २०१२/१३ या कालावधीत तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर मंत्री असतांना मी आमदार असतांना पाणी उपलब्धतेचे दाखले मिळविले होते. हे विद्यमान आमदार किशोर पाटील देखील मान्य करतात. आमदार असतांना मी ,चाळिगावचे तत्कालीन आमदार व भडगाव तालुक्यातील सुमारे २५ शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्या वेळीचे जलसंपदामंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन सात बलून बंधारे चा प्रश्न मांडला होता. अजित पवार यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता बलून बंधारे यशस्वी होत नसल्याचे मतजलसंधारण विभागाच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. त्या ऐवजी आधुनिक पध्दतीचे कमी खर्चाचे आणि कमी वेळात तयार होणारे बॅरेजेस यशस्वी होऊ शकतात असे सांगितले होते.त्या आधारे अजित पवार यांनी २०१४/१५ मध्ये बॅरेजेस बांधण्याचे इस्टिमेट काढण्याचे आदेश देखील काढले होते. बॅरेजेसची एव्हढी एकच प्रक्रिया बाकी राहिली होती. परंतु त्या नंतर राजकीय सत्तान्तर झाल्याने आणि आमचे कडे कमी अवधी असल्याने हा विषय तेथेच थांबला. पाच वर्षांपूर्वी हा विषय मार्गी लागणार होता. आणि सद्यस्थितीत जलसाठा होऊन शेतकऱ्यांना शेतीसाठी, पिण्याचा तसेच गुराढोरांना याचा लाभ मिळाला असता.! राज्यात आजही शेती सिंचन बाबत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.अश्या परिस्थितीत किचकट प्रक्रिया,कितीतरी कोटींचा येणारा खर्च आणि वेळ लागणारा, भविष्यात कदाचित यशस्वी न होणारे बलून बंधारे बांधण्याचा हट्ट खासदार आणि आमदार यांनी बलून बंधारे बांधण्याचा अट्टहास करू नये. राज्यातील आघाडी सरकार मध्ये मी देखील आहे. जलसंपदामंत्री राष्ट्रवादीचे आहेत. गरज पडल्यास खासदार व आमदारांनी राजकारण बाजूला ठेवून मला सोबत घेतल्यास शेतकरी हिताचा हा विषय जलसंपदामंत्री यांचे कडे मांडण्यास तयार आहे.असे सल्ला वजा आवाहन देखील माजी आमदार दिलीप वाघ यांनी खासदार उन्मेष पाटील व आमदार किशोर पाटील यांना प्रसार मध्यमाव्दारे केले आहे.