थकीत पीक विम्याच्या रक्कमेसाठी खा.उन्मेष पाटील व आ.सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांसोबत  केले ठिय्या आंदोलन

0
801

आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील (प्रतिनिधी)
दि, २६/२/२०२२
थकीत पीक विम्याच्या रक्कमेसाठी खा.उन्मेष पाटील व आ.सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांसोबत  केले ठिय्या आंदोलन
पाचोरा-  संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील खरीप हंगाम २०२० ची नुकसान भरपाई आजपावेतो प्रलंबित असून त्यामध्ये कापूस,उडीद,मूग,
सोयाबीन,तूर,मका,बाजरी यासाठी पाचोरा तालुक्यातील १७८६ शेतकऱ्यांकरिता ४४ लाख ७१ हजार २५९ रुपये आणि भडगाव तालुक्यातील २३ शेतकऱ्यांकरिता ०१ लाख ४३ हजार १७९ रुपये मंजूर असून सुद्धा गेल्या ०२ वर्षांपासून हे शेतकरी प्रलंबित रक्कम खात्यावर जमा होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.त्यासाठी खा.उन्मेष पाटील,आ.सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या नेतृत्वात भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी काल दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या कार्यालयातील दालनात शेतकऱ्यांचा समवेत ठिय्या आंदोलन केले.यावेळी खा.पाटील यांनी बोलताना सांगितले की वारंवार निवेदने देऊन देखील शासनस्तरावरून कुठलीही दखल घेतली जात नाही.पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी देखील याबाबत वारंवार चर्चा केली असता ते देखील या विषयात गंभीर नाहीत. परंतु यामध्ये शेतकरी पूर्णपणे भरडला जात असून, शेतकऱ्यांच्या समस्यांची या असंवेदनशील सरकारला कुठलीही घेणे देणे नाही.असे खा.पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तसेच कापूस,उडीद,मूग, सोयाबीन,तूर,मका,बाजरी यांचे पाचोरा व भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.त्यामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे २०२० च्या खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम थकीत असून एका बाजूला हे सरकार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची व ट्रान्सफॉर्मर ची वीज तोडणी करत आहे.शेतकर्‍यांकडे वीज देयके भरण्यासाठी तगादा लावत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्याची रक्कम ०२ वर्षे थकीत ठेवून शेतकऱ्यांची थट्टा करत आहे.असे अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले.त्यामुळे आज सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा नझाल्यास कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनाला बसण्याचा इशारा दिल्यानंतर खा.उन्मेष पाटील आ. सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात अमोल शिंदे शेतकऱ्यांसह सायं ०५:३० वा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांच्या दालनात आंदोलनास बसले व जोपर्यंत शेतकऱ्यांची थकीत रक्कम खात्यावर जमा होत नाही अथवा कृषी विभागाकडून लेखी आश्वासन दिले जात नाही. तोपर्यंत सदर ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी दिला.
याप्रसंगी कृषी अधीक्षक ठाकूर यांनी कृषी आयुक्त धीरज कुमार,कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व त्यानंतर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी खासदार पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणली तरीदेखील आपल्या निर्णयावर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवल्याने रात्री उशिरा ११:०० च्या सुमारास कृषी अधीक्षकांनी ३० दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर सदरची रक्कम जमा होईल असे लेखी स्वरूपाचे पत्र दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले, त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.असे खा.पाटील आ.भोळे यांच्यासह अमोल शिंदे यांनी सांगितले,त्यामुळे  जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून कठोर भूमिका घेऊन आंदोलन करणाऱ्या खा.पाटील, आ.भोळे यांच्यासह अमोल शिंदे यांचे पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कौतुक केले व आभार मानले.