आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दिनांक – 14 मार्च, 2022
जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्तआज पाचोरा येथे कार्यक्रम
जळगाव, जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त पाचोरा येथे मंगळवार 15 मार्च 2022 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे. 15 मार्च हा दिवस संपुर्ण जगभरात ‘‘ जागतिक ग्राहक हक्क दिन’’ म्हणून साजरा करण्यात येतो. ग्राहकाचे हक्क आणि गरजांबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी ग्राहक दिनाचे औचित्य साधून सामुहिक प्रयत्न केले जातात. हा दिवस साजरा करतांना ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची मागणी तसेच बाजारात ग्राहकांप्रती होणारे गैरवर्तन व फसवणूक आणि ग्राहकाच्या अधिकारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सामाजिक अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होते. दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा होणा-या जागतिक ग्राहक हक्क दिनाचे निमित्ताने जागतिक स्तरावर ग्राहकांना भेडसावणाऱ्या महत्वाच्या समस्येवर प्रकाश टाकण्यात येतो. यावर्षी साजरा करावयाच्या जागतिक ग्राहक दिनासाठी ‘‘ Fair Digital Finance ’’ अशी संकल्पना ( थीम ) केंद्र शासनाकडून निश्चित करणेत आली आहे.
या वर्षाचा दि. 15 मार्च 2022- जागतिक ग्राहक हक्क दिनाचा जिल्हा स्तरीय कार्यक्रम निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथे आयोजित करणेत आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर पाटील यांची उपस्थिती रहाणार असुन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मा. अध्यक्ष , जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग , जिल्हा अग्रणी बॅँक व्यवस्थापक, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांची ऑनलाईन उपस्थिती रहाणार आहे. पाचोरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी देखील या कार्यक्रमास उपस्थित राहतील. जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या जिल्हा स्तरीय कार्यक्रमासाठी कैलास चाव़डे, तहसिलदार पाचोरा यांनी नियोजन केले आहे.