आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी पाचोरा
३१ जुलै २०२२
पाचोऱ्यात साकारणार जॉगिंग ट्रॅक,स्काय वॉक सह नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स
१० कोटींच्या कामांना मंजुरी ;आ.किशोर आप्पा पाटील यांचे कडून शहर सौंदर्यकरणाला नवीन आयाम
पाचोरा शहर सौंदर्यकरणाच्या विकास कामात पुन्हा एकदा भर घालत आ.किशोर आप्पा पाटील यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल १० कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी आणली असून यात महाराणा प्रताप चौकापासून ते रेल्वे ब्रीज पर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस सेवा रस्त्यांची कामे, शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला जॉगिंग ट्रॅक, तसेच महामार्गाचे रस्ता क्रॉसिंग साठी स्काय वॉक सह फुलझाडे लावणे या कामांसाठी पाच कोटी तर पाचोरा शहरातील जीर्ण झालेले सिव्हिक सेंटर मधील टपरी शॉपस् पाडून त्याठिकाणी ए विंग दुकान केंद्राचे बांधकाम करणे या कामासाठी ५ कोटी रुपये अशा एकूण १० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असून या कामांमुळे पाचोरा शहराच्या सौंदर्यकरणाला नवीन आयाम मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान यासंबंधीचा शासन निर्णय १८ जुलै रोजीच झाला असून जॉगिंग ट्रॅक मुळे शहरातील आरोग्यप्रेमी नागरिकांना फिरण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार असून यामुळे संभाव्य अपघात टाळले जाणार असुन महिला भगिनींना देखील सुरक्षितपणे वावर करता येणार आहे. दरम्यानच्या काळात शहरात घडलेल्या धूम स्टॅइलने झालेल्या साखळी चोरी सारख्या प्रकारांना आळा बसण्यास मदत मिळणार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता क्रॉसिंग करतांना होणार अपघात, शाळकरी मुले,महिला, अबाल वृध्द अपंग आदी घटकांना स्काय वॉकमुळे रस्ता क्रॉसिंग करतांना सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन दिलासा मिळणार आहे. हा स्काय वॉक गाडगेबाबा नगर जवळील क्रॉसिंग व इंदिरा नगर लगत अशा दोन जागी उभारला जाणार असून यामुळे यामुळे गाडगेबाबा नगर, भास्कर नगर, जुना अंतुर्ली रोड, तक्षशिला नगर, एम आय डी सी कॉलनी ओ. ना. वाघ नगर तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या त्या बाजूस राहणाऱ्या सर्वच नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्त्यांची कामे करून दुतर्फा फुलझाडे लावली जाणार असल्याने शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला देखणे रूप येणार असुन यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलावण्यास हातभार लागणार आहे.
तसेच जीन भागात असलेल्या सिव्हिक सेंटर च्या टपरी शॉपस पाडून त्याठिकाणी ए विंग दुकानांची निर्मिती करत शॉपिंग कॉम्प्लेसची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील व्यापार वृद्धीस मदत मिळणार आहे.
प्रतिक्रिया
नासिक शहरातील इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅकच्या धर्तीवर पाचोऱ्यात देखील आरोग्य प्रेमी नागरिकांसाठी चांगला जॉगिंग ट्रॅक असावा अशी मागणी पुढे आली होती तसेच महामार्ग ओलांडतांना महिला, विद्यार्थी अबाल वृद्धांना होणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेता स्काय वॉक उभारण्याची गरज लक्षात घेता या कामांना मंजुरी आणली असून लवकरच शहरातील अजून इतर महत्वपूर्ण कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.