सुधाकर पाटील यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !

0
197

आरोग्यदूत न्यूज
रईस बागवान,
पाचोरा शहर प्रतिनिधी,
दि, २४ फेब्रुवारी २०२३
सुधाकर पाटील यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !
जवखेडेसिम ता.एरंडोल येथील मूळ रविवासी आणि ठाणे जिल्ह्यातील
शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेलवली बांगर शाळेचे सहशिक्षक श्री. सुधाकर रामदास पाटील यांना महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.मंगलप्रभात लोढा, शिक्षक आमदार मा.श्री. कपिल पाटील, सचिव श्री. रणजित सिंह देओल इ.च्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या १०८ प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
शहापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा परीक्षांची गोडी लावण्यात सुधाकर पाटील सर यशस्वी झाले असून ते शहापूर पॅटर्नचे उद्गाते मानले जातात.
त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने शहापूर तालुक्याचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल दिवसेंदिवस वाढतच चालला असून यावर्षी शहापूर तालुक्यातील ३०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. NMMS शिष्यवृत्ती परीक्षेतही शहापूर तालुका अव्वल स्थानी असून तालुक्यातील १५० विद्यार्थ्यांना दरवर्षी १२००० रु .शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यांचे ज्ञानकुंभ हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरले असून आतापर्यंत त्याच्या चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. याशिवाय शिष्यवृत्ती प्रश्नसंच, प्रश्नांचा अनमोल खजिना यांसारख्या पुस्तकांची निर्मिती त्यांनी ज्ञानकुंभ टीमच्या मदतीने केली आहे.
शाळेच्या भौतिक सुविधांसाठी विविध सामाजिक संस्थांकडून सुधाकर पाटील सरांनी वीस लाख रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून घेतला असून त्यांच्या माध्यमातून सारंगपुरी, साखरोली आणि शेलवली बांगर शाळांचा कायापालट झाला आहे.
आदिवासी उन्नती मंडळ, विद्यादान सहाय्यक मंडळ, नॉलेज अकॅडमी, विंग्ज फॉर ड्रीम,सत्य साई सेवा समिती ,सानेगुरुजी पतपेढी इ .सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी विकासाच्या अनेक योजना यशस्वी केल्या आहेत.
शेलवली गावात दोन दिवसीय शिक्षण महोत्सव आयोजित करून संपूर्ण परिसरात एक वेगळा आदर्श निर्माण करण्यात ते यशस्वी झाले असून अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना मौलिक मदत मिळवून देण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. त्यांच्याच माध्यमातून शहापुरातील आदर्श इंजिनियर श्री.संजय वाडीले यांनीही शहापूर तालुक्यातील 20 विद्यार्थी दत्तक घेतले असून त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाचा भार उचलला आहे.
तालुका आणि जिल्हा स्तरावर शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या अत्यंत कुशल आणि मेहनती शिक्षकाला राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याने संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यापासून दररोज त्यांना विविध स्तरातील लोक प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन करत आहेत. त्यांच्या सारख्या कर्तृत्ववान शिक्षकाला पुरस्कार मिळाल्याने खऱ्या अर्थाने पुरस्काराची उंची वाढल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे.